कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून राहूल प्रकाश आवाडे हे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी इचलकरंजी भेटीमध्ये दिले.कोल्हापूरात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणूकीसाठी भाजपकडून अमल महाडिक रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत आवाडे गटाकडे २३ मतांचा गठ्ठा आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर गेली दोन वर्षे आमदार प्रकाश आवाडे हे देखील भाजपसोबतच आहेत. त्यामुळे आवाडे यांनी अमल महाडिक यांना पाठबळ द्यावे यासाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे, राहूल आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.विधान परिषद निवडणुकीसाठी राहूल आवाडे हे देखील इच्छुक होते. परंतू महाविकास आघाडीतून पालकमंत्री सतेज पाटील हे रिंगणात आहेत. काँग्रेसमध्ये असताना आवाडे व सतेज पाटील यांचे चांगले संबंध होते व ते आजही आहेत. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय वैरत्व नको म्हणून आवाडे यांनी या उमेदवारीसाठी फारसा जोर लावला नाही. त्याऐवजी त्यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीस प्राधान्य दिले.हातकणंगले लोकसभा मतदार संघातून गेल्या निवडणुकीतच राहूल आवाडे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी गाठीभेटीही घेतल्या होत्या परंतू त्यावेळी धैर्यशील माने यांना संधी मिळाली व ते खासदारही झाले. तेव्हापासून राहूल आवाडे हे अस्वस्थ होते. शिवसेना उमेदवारीचा निर्णय झाला असता तर मीच खासदार झालो असतो असे त्यांना आजही वाटते. आता या मतदार संघातून धैर्यशील माने हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी व भाजप यांच्यापासून समान अंतरावर राहून या निवडणूकीस सामोरे जायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला उमेदवार शोधणे आवश्यकच होते. त्या जागेवर आता राहूल आवाडे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. याविषयी आवाडे यांनी चंद्रकांत पाटील यांना चर्चेदरम्यान बोलले असता यावर चंद्रकांत दादांनी स्मितहास्य दिले. त्यामुळे राजकीय चर्चेना उधान आले आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत लोकसभेचे धुमशान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 1:40 PM