हेरले गावामधील बीएचएमएस. पदवी घेतलेले डॉ. अमित पाटील हे ताप, थंडी आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर आपल्या रुग्णालयात आणि रुग्णाच्या घरी जाऊन उपचार करत आहेत, अशी तक्रारी तालुका आरोग्य यंत्रणेकडे आली होती. तक्रारीनुसार बुधवारी डॉ. सुहास कोरे यांनी डॉ. अमित पाटील यांच्या रुग्णालयावर छापा टाकून तपासणी केली. डॉ. पाटील हे रुग्णालयाशेजारीच असलेल्या लॅबमधून रुग्णाचे रक्त, लघवीसह इतर चाचण्या तपासणी करून उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या रुग्णालयामध्ये असलेल्या औषध दुकानामध्ये कोरोना रुग्णांना देण्यात येणारी औषधे मिळून आल्याचे तपासणी अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. पाटील यांच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे असतानाही त्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेला माहिती दिली नाही, एमबीबीएस किंवा एमएस डॉक्टरच्या उपचार पद्धतीची औषधे बीएचएमएस डॉक्टर वापरू शकत नाहीत. ती डॉ. अमित पाटील वापरत असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी स्पष्ट केले. रुग्णाचे जाबजबाब घेण्याचे काम गुरुवारी संपेल, त्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अमित पाटील यांच्यावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
ग्रामीण भागातील गावोगावचे कोरोना रुग्ण नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे तसेच कोरोना रुग्णांवर गावपातळीवर उपचार करणाऱ्या आणि कोरोना लक्षण असलेल्या रुग्णांची माहिती लपविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करणार. डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेला सहकार्य करावे.
डॉ. सुहास कोरे, तालुका आरोग्य अधिकारी.