गांधीनगर (ता. करवीर) मुख्य रस्त्यावर निगडे वाडीजवळ एका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील कॅफे अँड रेस्टो हॉटेलमध्ये बुधवारी रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी छापा टाकून ३४ जणांच्यावर कारवाई करून ११ मोटरसायकली जप्त केल्या. याबाबत गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
धीरज लखमीचंद केसवाणी (वय २५ रा. गांधीनगर), पंकज संजय वासवानी (वय २३, रा. पाच बंगला परिसर, कोल्हापूर) या दोन हॉटेल मालकासह ३४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यात दोन हॉटेल मालकाशिवाय २३ ग्राहक व ९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवहार व हॉटेल बंद ठेवण्याचा बंदी आदेश जाहीर केला असताना देखील बुधवारी रात्री गांधीनगर मुख्य रस्त्यावर एका बिल्डिंगवर दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या डायट डिलाईट कॅफे अँड रेस्टो हॉटेल चालू ठेवून ग्राहकांना एकत्र जमून कामगारांच्या करवी जेवण देत होते. त्यांच्या तोंडाला मास्क न लावता, सामाजिक अंतर न ठेवता हा सर्व प्रकार सुरू होता. विषाणूंचा संसर्ग न होणे करता बंदी आदेशाचे उल्लंघन करून पार्टी आयोजित केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक चेतन बोंगाळे यांनी दिली आहे अधिक तपास गांधीनगरचे पोलीस नाईक आकाश पाटील करत आहेत.