कोल्हापूर : जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) जवळील गिरोली ते दाणेवाडी रोडवर असलेल्या मातोश्री लॉजवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसायप्रकरणी लॉजमालकांसह तिघांना अटक केली, तर पीडित महिलेची सुटका केली. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी केली. छाप्यात पोलिसांनी रोकडसह दोन मोटारकार असा सुमो १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : लॉजमालक संतोष गणपती जुगर (वय ४४ रा. वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा), एजंट समीर गुलाब शेख (वय २७, रा. बापुराम नगर, कळंबा, कोल्हापूर. मूळ गाव- बारामती), एजंट शोमन दास (रा. परगना, पश्चिम बंगाल).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एजंट समीर शेख हा लॉजमालक संतोष जुगर याच्या मदतीने बेकायदेशीररित्या मुलींना आणून त्यांना गिऱ्हाईक पुरवून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने त्या लॉजवर छापा टाकला. यावेळी तिघांना अटक करून पीडितेची सुटका केली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वषेण पथक व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहा. पो.नि. श्रध्दा आंबले, हे.कॉ. रवींद्र गायकवाड, आनंदराव पाटील, सायली कुलकर्णी, मीनाक्षी पाटील, अभिजित घाटगे, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे यांच्या पथकाने केली.