लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : यड्राव (ता.शिरोळ) येथील हॉटेल ॲकॉर्डमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहाजणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, सहा मोबाइल, तीन चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
संतोष गोपाल शेट्टी (वय ५३, रा. कापड मार्केट), विनोद बापू चव्हाण (४९), नासीरहुसेन शब्बीरअहमद नदाफ (४८), विशाल बाळासाहेब माळी (३५, तिघे रा. सांगली), संतोष मनोहर खामकर (४५, रा. जयसिंगपूर) व रमेश विश्वनाथ बावचे (३३, आगर, ता.शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.