कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथे गोसावी गल्लीत एका घरात सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली. कारवाईत दहाजणांना अटक केली, पाचजण पळून गेले. कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह सुमारे एक लाख ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत अटक केलेल्यांची नावे अशी : शंकर बापू येळवडे (वय ६१), विकी काशीनाथ नाळे (३१), उमेश कृष्णा गोसावी (३८), किरण अंकुश गोसावी (२२), आकाश गणपती गोसावी (२६), सचिन रामचंद्र गोसावी (२६), अनिल बाळू पडियार (२५), संजय राजाराम वाडकर (४२), चंद्रकांत एकनाथ आयरेकर (६१, सर्व रा. बालिंगा, ता. करवीर), घरमालक गणपती गोसावी (रा. गोसावी गल्ली, बालिंगा). छाप्यावेळी सरदार हिंदुराव घोडके, दिलीप खोत, शशिकांत चौगले, पांडुरंग बाळासाहेब वाडकर, संभाजी शिवाजी काटे पाचजण पळून गेले. याबाबत माहिती अशी की, बालिंगा येथील गोसावी गल्लीत गणपती गोसावी यांच्या घरात तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रात्री त्या घरावर छापा टाकला असता १४ जण पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याचे लक्षात आले.
छाप्यावेळी पाचजण पळून गेले; तर दहाजणाना अटक करण्यात आली. स्वत:च्या फायद्यासाठी घरात जुगार खेळण्यास परवानगी दिल्याबद्दल घरमालक गणपती गोसावी याच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला. कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल हॅडसेट व दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.