कोल्हापूर : बेकायदेशीर खासगी सावकारीसह भूखंड माफियांची टोळी म्हणून बदलौकीक निर्माण झालेल्या ‘एसएस गँग’चा दुसऱ्या फळीतला म्होरक्या संशयित अभि महाडिक याच्यासह साथीदारांच्या घरांवर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री छापे टाकले.
यावेळी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. संशयित अभि ऊर्फ युवराज मोहन महाडिक (मंगळवार पेठ), युनुस हसन मुजावर (रा. राजारामपुरी), चालक धीरज आणि पार्थ हे पसार आहेत.दरम्यान, ‘एसएस गँग’चा मुख्य म्होरक्या सूरज हणमंतराव साखरे, त्याचे साथीदार ऋषभ सुनील भालकर , पुष्कराज मुकुंद यादव यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांची कळंबा कारागृहात रवानगी केली.
साखरे टोळीला मोक्का लावल्याने त्यांची गाठभेट होणार नाही; यासाठी त्यांच्या नातेवाईक, मित्रांनी न्यायालय आवारात मोठी गर्दी केली होती. ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणल्यानंतरही या ठिकाणी गर्दी केली होती. कुटुंबीयांतील लोकांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी त्यांना हटकले.
पुणे न्यायालयासही संशयितांवर मोक्का कारवाईला मंजुरी मिळाली असून, त्यांचा ताबा घेऊन हजर करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने मंजुरी देऊन बुधवारी हजर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सशस्त्र बंदोबस्तात संशयितांना हजर केले जाणार आहे. या सर्व गुन्हेगारांची बँक खाती गोठविण्यासाठी बँकेला पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईक, मित्रांचीही चौकशी पोलीस करीत आहेत.