गारगोटी : गारगोटीतील बसस्थानक परिसरातील सन्मित्र कला, क्रीडा मंडळाच्या जुगार अड्ड्यावर रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा मारून एक लाख रुपयाच्या रोख रकमेसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून, १९ जणांना अटक झाली आहे.
गारगोटी येथे सन्मित्र कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा शामराव देवकर यांच्या घरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा मारून १९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ४ हजाराच्या रोकडसह चारचाकी वाहन, ७ मोटारसायकल, १७ मोबाईल हॅन्डसेट, गुटखा, तंबाखू व जुगाराचे साहित्य असे सहा लाखांचे साहित्य ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायदा, कोविड संसर्ग पसरविण्याचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भिकाजी सावंत (वय ४२), सर्जेराव सावंत (४५, सोनाळी), संतोष सोरटे (४४, खडक गल्ली), सोमनाथ भोसले (३८, महादेव चौक), किरण कलकुटकी (५३, शिवाजीनगर), दीपक साळवी (४०, सोनाळी) (सर्व गारगोटी) सतीश कांबळे (४८, सोनारवाडी), सुरेश मांगले (५४), पुंडलिक गुरव (४९, दोघेही कडगांव), बाळासो चौगुले (५१, गोरंबे), युवराज साठे (४०, सिद्धनेर्ली), चंद्रकांत डवरी (६०, मुरगूड), पांडुंरंग पोरे (५७, निढोरी, ता. कागल), अनिल कदम (४५), संजय भोसले (५७, शेणगाव), आनंदा नाईक (६०) बाळासो कळके (७०, दोघे मडिलगे बुद्रुक), दत्तात्रय पाटील (३३, नाधवडे), धनाजी चव्हाण (४८, सावर्डे पाटणकर, ता. राधानगरी) यांचा समावेश आहे.