लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भादोले (ता. हातकणंगले) येथील शिवाजी दत्तात्रय पाटील व अजित व्यंकटराव पाटील यांच्यावर सहकार विभागाने शुक्रवारी पेठवडगाव व भादाेले येथे छापे टाकले. यामध्ये कोरे धनादेश, खरेदीपत्रे, भिशी नोंद वहीसह इतर साहित्य सापडले आहे. सहकार विभागाच्या पथकाने हे साहित्य जप्त केले असून संबधितांवर आज, शनिवारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई सुरू आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत त्यांच्याकडे भादोले येथील दोन सावकारांविरोधात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार शिरोळचे सहायक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिवाजी पाटील यांच्या ऋग्वेद ज्वेलर्स पेठवडगाव येथे छापे टाकले. या वेळी दोन कोरे धनादेश, आर. सी. बुक, खरेदीपत्रे, खरेदी दस्त, हक्कसाेड पत्र, भिशी नोंद वही, इसमांना रकमा दिल्याचे बुक नोंद वह्या तीन. दुसऱ्या पथकाचे प्रमुख करवीरचे सहायक निबंधक बाळासाहेब पाटील यांनी शिवाजी पाटील यांच्या भादोले येथील राहत्या घरी छापे टाकले. या वेळी कायम खुश खरेदीपत्रे, वटमुखत्यारपत्र, करापत्रावरून खरेदीपत्र आदी सापडले.
भादोले येथील अजित व्यंकटराव पाटील व विजय व्यंकटराव पाटील यांच्या घरी छापे टाकले मात्र यामध्ये काहीही सापडले नाही.
या होत्या तक्रारी-
तक्रारदाराने शिवाजी दत्तात्रय पाटील यांच्याकडून २६ लाख २० हजार रुपये ५ टक्के व्याजाने तर अजित व्यंकटराव पाटील व विजय व्यंकटराव पाटील यांच्याकडून २० लाख ५ टक्के व्याजाने घेतले आहे. त्याबदल्यात तक्रारदाराची ७७ गुंठे जमीन दांडगाव्याने खरेदीपत्र करून घेतली आहे. त्याचबरोबर शिवाजी पाटील यांनी ४ लाख व्याजाने देऊन तक्रारदाराचे घर ताब्यात घेतले असून, आतापर्यंत पाच लाख परत करूनही ४० लाख रुपये येणे बाकी दाखवल्याची तक्रार दिली आहे.
फोटो ओळी : शिवाजी पाटील यांच्या पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील ऋग्वेद ज्वेलर्सवर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. (फोटो-०९०७२०२१-कोल-वडगाव)