कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या ‘रायगड विकास प्राधिकरण’चे अध्यक्षपद सत्तांतरानंतरही खासदार संभाजीराजे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रामध्ये गतवेळी भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी पक्षात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. याच दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे यांची राज्यभर असलेली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदारपदी नियुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घालून त्यांचा सन्मान केला.याही पुढे जात त्यांनी संभाजीराजे यांच्या रायगड विकासासाठीच्या प्रयत्नांना मूर्त रूप देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपदही संभाजीराजे यांच्याकडे दिले. आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपयांची कामे या ठिकाणी झाली आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.
खासदार संभाजीराजे हे शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील पुरातत्त्व विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून रायगड विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी शुक्रवारी या दोघांचीही मुंबईत भेट घेतली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे.
नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच निर्णय घेताना आम्ही रायगड विकास प्राधिकरणाचा जो विकासकामांचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, तोच प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. यावरून त्यांचे किल्ल्यांवरील प्रेम दिसून येते. विविध विभागांचे अनेक प्रस्ताव असताना त्यांनी किल्ले रायगडच्या विकास प्रस्तावाला प्राधान्य दिले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.खासदार संभाजीराजे .अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण