संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कोयना एक्सप्रेसच्या प्रवाशांकडून रेल्वेकडे सर्वाधिक तक्रारी येत आहेत. बेड रोल, चार्जिंग पाँईंट, फॅन, ईसीसंदर्भातील या तक्रारी असून पुणे विभागीय रेल्वेच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी याची दखल घेतली आहे. रविवारी सकाळी त्यांनी कोल्हापूर रेल्वेस्थानकाला भेट देउन येथील सुविधांची तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्यांची चौकशी करत नियमित तपासणी केली. सह्याद्री एक्सप्रेस मुंबईपर्यंत सोडण्यासंदर्भात सातत्याने प्रस्ताव पाठवण्यात येत असल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला.
मार्च २०२४-२५ पर्यंत पुणे आणि मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल असे सांगून गतीशक्ती योजनेतील कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्गाचे मोठ्या प्रकल्पाच्या सर्वेक्षण सुरु आहे, त्यासाठी दोनवेळा निधी मिळालेला आहे अशी माहितीही त्यांनी दिली. वंदे भारत एक्सप्रेससंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडून निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. दुबे यांनी कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्सला भेट देऊन नियमित तपासणी केली. त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता शादाब जमाल, मिरज विभागातील सहाय्यक विभागीय यांत्रिकी अभियंता राहुल मेदाने उपस्थित हाेते.
यावेळी त्यांनी अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूरातील रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाचीही प्रत्यक्ष पाहणी केली. हे काम संथपणे सुरु असले तरी लवकरच त्याला गती येईल असेही दुबे म्हणाल्या. लोंढा मागार्वरील दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. पुणे मिरज मार्गावरील दुहेरीकरणाचे काम लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. वैभववाडी मार्गाचा डीपीआर तयार आहे, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, रेल्वे बोर्डाच्या मान्यता मिळताच याचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. दुबे सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी विशेष रेल्वेने कोल्हापुरात आल्या, त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दुपारी त्यांनी लिनन रुमची आणि कोचिंग डेपोचीही पाहणी केली. नियमित तपासणीनंतर त्या महाराष्ट्र एक्सप्रेसने दुपारी रवाना झाल्या.