कोल्हापूर : कोरोना संसर्ग काळात रेल्वे प्रवाशांनी स्थानकावर विनाकारण गर्दी करू नये, याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्स स्थानकातील प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर पन्नास रुपये केले होते. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, मृत्यूदर जादा असल्याने राज्य शासनाने निर्बंध हटविलेले नाहीत. त्यामुळे प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दर अजूनही जैसे थेच आहेत. सध्या केवळ दोनच रेल्वे कोल्हापूर स्थानकातून सुरू आहेत.
रेल्वे प्रशासनाने कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपासून कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या १६ रेल्वे गाड्यांपैकी केवळ चार रेल्वे सुरू ठेवल्या होत्या. मात्र, दुसरी लाट आल्यानंतर त्यातील तीनच रेल्वे सुरू ठेवल्या. त्यातही कमी करून सध्या केवळ कोल्हापूर स्थानकातून महाराष्ट्र एक्स्प्रेस आणि तिरुपती एक्स्प्रेस (हरिप्रिया) सुरू आहे. त्यात केवळ महाराष्ट्र एक्स्प्रेसला अत्यल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. प्लॅटफाॅर्म तिकीट काढून प्लॅटफाॅर्मवर जाणाऱ्या प्रवासी किंवा त्यांचा निरोप देण्यासाठी आलेले नातेवाईक क्वचितच प्लॅटफाॅर्म तिकीट काढतात. दहा रुपये तिकीट असताना कारवाई नको म्हणून प्लॅटफाॅर्मवर जाताना अनेकजण तिकीट काढत होते. महिन्याकाठी ३५०० हून अधिकजण नियमित रेल्वे सेवा सुरू असताना तिकीट स्वत:हून घेत होते. मात्र, लाॅकडाऊन काळात सर्वच रेल्वे बंद झाल्या. त्यात यातून मिळणारा महसूलही बुडाला. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवा काहीअंशी रुळावर येऊ लागली आहे. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्यानंतर रेल्वे प्रवाशांकडून तिकिटातून मिळणारा महसूल कमी झाला. त्यामुळे गर्दीचे ठिकाण आणि ‘अ’ दर्जाचे रेल्वेस्थानक म्हणून या स्थानकातील प्लॅटफाॅर्मवर जाण्यासाठी तिकिटाचा दर पन्नास रुपये इतका करण्यात आला. मात्र, दोनच रेल्वे सुरू असल्याने दिवसाकाठी सध्या केवळ १० ते १५ जण असे तिकीट घेत आहेत.
रेल्वे संख्या घटविल्याने कमाईवर परिणाम
राज्य शासनाने लावलेल्या निर्बंधांमुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल १६ रेल्वे गाड्यांपैकी केवळ दोनच रेल्वे कोल्हापूर स्थानकातून सुरू आहेत. त्यामुळे प्रवासी संख्याही अत्यल्प आहे. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांचा प्रतिसादही कमी मिळत आहे. केंद्र आ्रणि राज्य सरकार ज्यावेळी निर्बंध हटवून हिरवा कंदील दाखवेल त्यावेळीच प्रवासी संख्या आणि प्लॅटफाॅर्म तिकिटातूनही रेल्वे प्रशासनाला चांगली कमाई होईल. त्यानंतर प्लॅटफाॅर्म तिकिटाचे दरही पूर्वीप्रमाणे दहा रुपये होतील. सध्या तरी प्लॅटफाॅर्म तिकीट दर पन्नास रुपयेच आहेत.
दिवसाकाठी १०-१५ तिकिटेच
कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकातून केवळ दोनच रेल्वे सुरू आहेत. त्यात प्रवाशांना निरोप देण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी यांची संख्या कोरोनामुळे घटली आहे. त्यात प्लॅटफाॅर्म तिकिटाचा दर ५० रुपये इतका असल्यामुळे प्लॅटफाॅर्मवर जाण्याचे टाळतात. केवळ बाहेरूनच निरोप दिला जात आहे. त्यामुळे दिवसाकाठी १० ते १५ तिकीट काढून प्लॅटफाॅर्मवर जात आहेत. त्यातून मिळणारे उत्पन्नही घटले आहे.
रेल्वेसंख्या - २, (महाराष्ट्र एक्स्प्रेस, हरिप्रिया एक्स्प्रेस)
रोजची प्रवासी संख्या - ४५०-८५०
प्लॅटफाॅर्म तिकिटातून कमाई अशी
२०१९- ४, २०,००० रुपये
२०२०- ९०,००० रुपये
२०२१- ४० ,००० रुपये
कोट
कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सध्या महाराष्ट्र एक्स्प्रेस व हरिप्रिया एक्स्प्रेस या दोनच रेल्वे सुरू आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांकडूनही प्रतिसाद कमी मिळत आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळाल्यानंतर बंद झालेल्या रेल्वे पुन्हा सुरू केल्या जातील.
- ए. आय. फर्नांडिस, स्टेशन प्रबंधक, कोल्हापूर रेल्वेस्थानक