कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. सकाळी वातावरण निवळले; पण दुपारनंतर पुन्हा आभाळ भरून आले. बोचऱ्या वाऱ्यामुळे अक्षरश: सर्वांनाच हुडहुडी भरली आहे.केरळ किनारपट्टीवरील ‘क्यार’ चक्रीवादळ ओमानकडे सरकल्याने दिवाळीत पाऊस थांबला. हे वादळ शमते नाही तोवर ‘महा’ हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. परिणामी कर्नाटक, गोवा, कोकणसह महाराष्ट्रातही पुन्हा पावसाळा सुरू झाला आहे.
शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासभर पाऊस बरसला. सकाळपासून वातावरण निवळल्याने दुपारपर्यंत कमालीचा उष्मा जाणवत होता. संध्याकाळी तर आभाळ एवढे दाटून आले की पाऊस कधीही कोसळेल, असेच वातावरण होते.दिवाळी झाली की हिवाळ्यातील थंडीचे आगमन होते; पण यावर्षी दिवाळी संपली तरी अजून पावसाळा सुरूच असल्याने गुलाबीऐवजी वादळी पावसाच्या बोचऱ्या थंडीने अंग गारठण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. वारे वाहत असल्याने हुडहुडी भरत आहे.विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाजगोवा, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सोसाट्याचा वारा वाहील, असाही इशारा दिला आहे. याशिवाय पुढील तीन दिवस तुरळक पावसाची हजेरी कायम राहील, असाही हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.गुरुवार (७ नोव्हेंबर) पर्यंतचा हवामान अंदाजरविवार : अंशत: ढगाळ आणि तुरळक पाऊससोमवार : अंशत: ढगाळ, अत्यल्प पाऊसमंगळवार : अत्यल्प पाऊसबुधवार : मेघगर्जनेसह जोरदार पाऊसगुरुवार : मेघगर्जनेसह हलका पाऊसपिके वाचविण्याची धडपडगेल्या आठवड्यात घोंगावणारे ‘क्यार’ चक्रीवादळ पुढे सरकल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत काढणी, मळणीच्या कामास सुरुवात केली होती; पण हा आनंद काही फार दिवस टिकला नाही. दोन-तीन दिवसांत पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने आणि तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पावसापासून वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.