लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाली, मात्र त्यानंतर उघडीप दिली. पावसाळाचे वातावरण तयार झाले असले तरी त्याला ताकद लागत नाही. सध्या खरीप पिकांना जोरदार पावसाची गरज आहे.
मंगळवारपासून महाराष्ट्रात जाेरदार पाऊस काेसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे गेली दोन दिवस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या होत्या. सोमवारपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होत गेला. मंगळवारी सकाळी अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात सकाळी अकरा वाजता पावसाची रिपरिप सुरू झाली, साधारणत: तासभर पाऊस राहिला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते, हवेत मात्र गारवा जाणवत होता. तापमानातही घट होऊन कमाल तापमान २६ डिग्रीपर्यंत खाली आले होते. आज, बुधवारपासून जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महावितरणला अजून चिखलाचीच भीती
पंधरा ते वीस दिवस पाऊस नसल्याने पिके वाळू लागली आहेत. विहीर, नदीत पाणी असताना विद्युतपंपाला वीज नसल्याने पाणी उपसता येत नाही. नदीकाठचे खांब महापुरामुळे वाकले आहेत, त्याची दुरुस्ती झालेली नाही. शेतकरी महावितरणच्या कार्यालयात खेटे मारून वैतागले आहेत. नदीकाठी अजून चिखल असल्याने त्यातून काम करायचे कसे, असे उत्तर महावितरणचे अधिकारी देत आहेत.