लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात साेमवारी दिवसभर पावसाने उसंत घेतली. कडकडीत ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांचे पुराचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटापर्यंत खाली आली आहे.
मागील आठवड्यात सलग चार-पाच दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने शिवार पाण्याने भरून गेले. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर ऊस पिके आडवी पडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरीप पिके अजून कोवळी असल्याने त्यांना पावसाचा तडाखा सहन झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी पिके कुजली असून शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे.
रविवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होत गेला. सोमवारी तर पावसाने पूर्ण उसंत घेतली. सकाळपासूनच आकाश एकदमच स्वच्छ राहिले. अधूनमधून जिल्ह्यात हलक्या सरी कोसळल्या. कोल्हापूर शहरात मात्र पूर्ण उघडीप राहिली. दिवसभर कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नद्यांचे पाणी झपाट्याने कमी होत असून पंचगंगेची पातळी २९ फुटांपर्यंत खाली आली आहे. दिवसभरात दीड फुटाने पातळी कमी झाली असून अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रति सेकंद १,३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
खोळंबलेल्या पेरण्यांना गती येणार
अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. दोन दिवस पावसाने उसंत घेतली आहे, त्यात कडकडीत ऊन पडल्याने जमिनीला वाफसा आल्यानंतर पेरण्यांना पुन्हा गती येणार आहे.
‘आर्द्रा’ नक्षत्रात जेमतेम पाऊस
‘मृग’ नक्षत्रात धुवांदार पाऊस झाल्याने पावसाचे पुढील ‘आर्द्रा’ नक्षत्र काय करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सूर्याने सोमवारी उत्तर रात्री ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश केला. वाहन ‘कोल्हा’ आहे. या काळात कोकणात जोरदार तर पश्चिम महाराष्ट्रात जेमतेम पाऊस राहील, असा अंदाज आहे.