कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाचा जोर ओसरला; पण गगनबावडा तालुक्यात जोरदार सुरू आहे. कोल्हापूर शहरात दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद झाले असून, एकमेव दरवाजा खुला राहिल्याने त्यातून प्रतिसेकंद ३०२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.सोमवारी (दि. २७) दिवसभर जिल्ह्यात पावसाचा जोर राहिला. मंगळवारी सकाळपर्यंत पाऊस कायम होता; पण सकाळी अकरा वाजल्यापासून त्याने थोडी उसंत घेतली. दिवसभर अधूनमधून कोसळलेल्या सरी वगळता पावसाची उघडझाप कायम राहिली. सायंकाळनंतर शहरात पावसाची रिपरिप सुरू झाली; पण त्यात तेवढा जोर नव्हता.मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २६.३३ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७१.५० मिलिमीटर पाऊस झाला. सोमवारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते. पावसाचा जोर ओसरल्याने त्यांतील तीन दरवाजे बंद झाले.
धरणाचा क्रमांक पाचचा दरवाजा खुला असून, सध्या प्रतिसेकंद ३०२८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातील विसर्गही थोडा कमी झाला असून येथून ११५९०, तर दूधगंगा धरणातून चार हजार घनफूट विसर्ग सुरू असल्याने नद्यांना अजूनही फुग आहे. पंचगंगेची पातळी २५ फुटांपेक्षा अधिक झाली असून, तब्बल २८ बंधारे पाण्याखाली आहेत. १३ मालमत्तांची पडझड होऊन सव्वातीन लाखांचे नुकसान झाले आहे.