कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली. पाऊस कमी झाला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने नद्यांची फूग कायम आहे. अद्याप ४९ बंधारे पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.गेले चार -पाच दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने सोमवारी थोडी उसंत घेतली. सकाळी पावसाची भुरभुर राहिली पण त्यानंतर उघडीप होती. दुपार नंतर पावसाची रिपरिप राहिली तरी गेले दोन-तीन दिवस असणारा जोर दिसला नाही. पण धरणक्षेत्रात अद्याप पाऊस असल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
राधानगरी धरणाचा क्रमांक सहाचा स्वयंचलित दरवाजा खुला असून प्रतिसेंकद ३०२८ , वारणातून ९७६५ तर दूधगंगेतून ८ हजार घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातून प्रतिसेंकद ३० हजार ७१४ घनफुट पाणी विविध नद्यांमध्ये मिसळत असल्याने पूराच्या पाण्याची फूग कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी रविवार पेक्षा अर्धा फूटाने वाढली आहे. सध्या पंचगंगा ३३.६ फुटावरून वाहत आहे. विविध नद्यांवरील तब्बल ४९ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वहातूक काहीसी विस्कळीत झाली आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यात झाला आहे. हातकणंगले (४.७५), शिरोळ (२.८५), पन्हाळा (१२.८६), शाहूवाडी (४४), राधानगरी (२०.१७), गगनबावडा (४४), करवीर (९.६३), कागल (१३), गडहिग्लज (४.८५), भुदरगड (१६.२०), आजरा (१३), चंदगड (१६.६७).
पडझडीत साडे चार लाखांचे नुकसानसोमवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात १६ खासगी मालमत्तांची पडझड झाली. यामध्ये साडे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.