संदीप बावचे : शिरोळ
पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या शिरोळ तालुक्यात पावसाची नोंद सात केंद्रांवर घेतली जात आहे. कृषी व महसूल विभागाकडून एकत्रित मंडलनिहाय पर्जन्यमापकाद्वारे मूल्यमापन करून पावसाची नोंद घेतली जाते. त्यामुळे ही पर्जन्यमापके आधार ठरत आहेत. तीन शहरे व ५२ गावांतून संपूर्ण तालुक्यातील पावसाची सरासरी गृहित धरली जाते.
शिरोळ तालुक्यात कृष्णेसह, वारणा, दूधगंगा व पंचगंगा या चार नद्या बारमाही वाहतात. राजापूर बंधारा वरदान ठरला आहे. तालुक्यात सरासरी ४०० मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र, सन २००५, २००६ व २०१९ सालामध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्याला महापुराला सामोरे जावे लागले. त्यामुळे ‘पाऊस कमी, पण महापुराची हमी’ अशी परिस्थिती शिरोळ तालुक्याची आहे. जवळपास ४४ हून अधिक गावांना नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर उर्वरित गावांना पावसावर अवलंबून रहावे लागत असलेतरी पर्यायाने कूपनलिका, विहीर यांचा वापर केला जातो.
दरम्यान, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी शिरोळसह, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड व दत्तवाड असे मंडलनिहाय सात ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र आहेत. त्याद्वारे पावसाची नोंद घेतली जाते. मात्र, काही वेळेला अतिवृष्टीचे निकष ठरविताना ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांना नुकसानभरपाई दिली जाईल, असा निकष शासन पातळीवर निघतो. त्याचा फटका शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे पाऊस कमी असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास सरासरी पावसाची नोंद घेण्यात येऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
चौकट - याठिकाणी पर्जन्यमापके
शिरढोण, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, दत्तवाड अशा सात ठिकाणी तालुक्यात पर्जन्यमापके आहेत.