कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची भुरभुर राहिली आहे. जून संपत आला तरी अद्याप मान्सूनला ताकद लागेना. अरबी समुद्रात जमिनीपासून १५०० मीटर उंचीवर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने पावसाला जोर लागत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू राहिला. दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी मान्सूनला जोर पकडत नाही. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १०.९ मिलिमीटर पाऊस झाला असून, गगनबावडा व भुदरगड तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात चांगला पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली असून, पंचगंगा १५ फुटांपर्यंत पोहोचली आहे.७ जुलैनंतर जिल्ह्यात धुवाधारजिल्ह्यात अजून आठवडाभर पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा राहणार आहे. साधारणत: ७ जुलैनंतर धुवाधार कोसळणार असून, १२ जुलैपर्यंत पाणी पाणी करेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
गुजरातजवळ अरबी समुद्रात वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने ते ढग उत्तर महाराष्ट्रापासून गोव्यापर्यंत सक्रिय झाले आहेत. पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ढग अस्थिर होत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. - राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान, सांगली.