कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५ नंतर ढग दाटून आले. ६ नंतर मात्र दमदार पावसाला सुरुवात झाली. इचलकरंजी, कसबा सांगाव, हेरले परिसरात जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे मात्र पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे उष्णतेच्या झळांनी बेहाल झालेल्या नागरिकांना गारवा मिळाला. मात्र अचानकच झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ देखील उडाली. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने काही ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या तारा तुटल्या होत्या.
गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने अक्षरश: लाही लाही होवून जात आहे. काल, शुक्रवारी पहिल्यांदाज यावर्षीच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. पारा ३९ अंशांवर जावून पोहोचल्याने कोल्हापूरकर बेहाल झाले होते.