कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून कमाल तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अंधारुन आल्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. महावेधच्या रडारनुसार राधानगरी तालुक्यात आणि कुंभी धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील मौजे रेठरे येथील बाबुराब दादू जाधव (वय ६१) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. तर आजऱ्यात एक महिला जखमी झाली.करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ठिकाणी पाउस पडल्याची नोंद आहे.जिल्ह्यात आज दिवसभर उष्ण वातावरणामुळे उष्णतेच्या झळा लागल्या होत्या. दिवसभर ३४ हून अधिक डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. ढगाळ वातावरणातही सहन न होणारा उकाडा जाणवत राहिला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.गडहिंग्लज परिसरात सकाळीच पावसाने हजेरी लावली होती. करवीर तालुक्यातील म्हालसवडे परिसरात विजांचा कडकडाट होउन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बच्चेकंपनींनी या पावसाचा पुरेपूर आनंद लुटला. भुदरगड तालुक्यात गारगोटीसह आदमापूर, मुदाळतिट्टा आणि बिद्री परिसरात विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आजरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. आठवडा बाजारादिवशी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. राधानगरी तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कसबा तारळे परिसरात हलका पाऊस झाला. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिक वातावरणात गारवा पडल्याने सुखावले.जोतिबावरील पावसाचे खोटे व्हिडिओ व्हायरलजोतिबाची चैत्री यात्रा बुधवारी पार पडली. डोंगरावर पडलेला गुलाल धुण्यासाठी पाउस पडल्याचे खोटे व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र हे व्हिडिओ आज, शुक्रवारी पडलेल्या पावसाचे नव्हते. यापूर्वीच्या पावसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.
- शाहुवाडी : कडवी : ( १० मिमि)
- राधानगरी : भागोजी पाटीलवाडी :( ४), पडसाळी : (११), पडळी : (६), दूधगंगानगर : (१२), सरवडे : (१९), वाकी : (१४), हसणे : (१३)
- गगनबावडा : गगनबावडा (१), मांडुकली (३), रेवाची वाडी (१०) कुंभी धरण (२१)