कोल्हापूर : जिल्ह्यात आज, गुरुवारी अन् काल बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. आज, सकाळी पंचगंगेची पातळी 41 फूट 7 इंच इतकी असून, धोक्याच्या पातळीच्या (43 फूट) दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू केले आहे. आंबेवाडी, प्रयाग चिखली, आरे आदी गावांमधील हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंचगंगा नदीवरील 73 बंधारे पाण्याखाली आहेत.सोमवारी, मंगळवारी असणारा पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. पावसाने सकाळपासूनच उघडीप देत सूर्यनारायणाने दर्शन दिले होते. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी कोसळत राहिल्या. मात्र, काल, बुधवारी पहाटे पाच वाजता राधानगरी धरणाचा पहिला स्वयंचलित दरवाजा उघडल्याने पाण्याचा विसर्ग वाढला. एकापाठोपाठ एक असे चार दरवाजे खुले झाल्याने भोगावती नदीच्या पाण्याची तुंबी वाढत गेली. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत गेली. दिवसभरात फुटाने पातळीत वाढ झाली असली तरी धोका पातळीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. पुराचा धोका असलेल्या गावांमध्ये स्थलांतर सुरू केले आहे.
अलमट्टीतून विसर्ग वाढवलापावसाने उघडीप दिली असली तरी पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे महापुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असून प्रतिसेकंद 2 लाख घटफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
उघडीप असली तरी पातळी स्थिर राहणारराधानगरी धरणाचे दरवाजे खुले झाले तर ते पाणी पंचगंगेपर्यंत येण्यासाठी किमान आठ तास लागतात. त्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगेची पातळी स्थिर राहणार आहे.
चिखली, आंबेवाडीतील 500 कुटुंबे स्थलांतरित
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली व आंबेवाडी गावात अद्याप पुराचे पाणी आले नसले तरी दक्षता बाळगत जिल्हा प्रशासनाने दोन्ही गावांतील जवळपास 500 कुटुंबे सुरक्षितस्थळी स्थलांतरित केली आहेत.
कोल्हापूर-केर्ली मार्गावर पाणीकोल्हापूर ते केर्ली दरम्यानच्या रस्त्यावर दीड फुट पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक जोतिबामार्गे वळवण्यात आली आहे.
एसटीचे हे मार्ग बंद -कोल्हापूर ते गगनबावडाइचलकरंजी ते कुरुंदवाडगडहिंग्लज ते ऐनापूरमलकापूर ते शित्तूरचंदगड ते दोडामार्गगगनबावडा ते करुळ घाटआजरा ते देव कांडगाव
राधानगरी तालुक्यात काल 63.4 मिमी पाऊसजिल्ह्यात काल दिवसभरात राधानगरी तालुक्यात 63.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले- 3.4 मिमी, शिरोळ -1.3 मिमी, पन्हाळा- 28.7 मिमी, शाहूवाडी- 38.1 मिमी, राधानगरी- 63.4 मिमी, गगनबावडा- 55.4 मिमी, करवीर- 8.8 मिमी, कागल- 14.1 मिमी, गडहिंग्लज- 12.7 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 65 मिमी, चंदगड- 52.7 मिमी असा एकूण 26.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
राधानगरी धरणातून 4456 क्युसेक विसर्गराधानगरी धरणात 234.76 दलघमी पाणीसाठा आहे. आज, सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3 व 6 खुले असून सध्या धरणातून 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाराधानगरी 234.76 दलघमी, तुळशी 91.53 दलघमी, वारणा 883.92 दलघमी, दूधगंगा 610.34 दलघमी, कासारी 64.49 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.82 दलघमी, पाटगाव 94.61 दलघमी, चिकोत्रा 40.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
काल, बुधवारी राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे असे उघडत गेलेपहाटे 5.30 वाजता - गेट क्रमांक 6सकाळी 8.55 वाजता - गेट क्रमांक 5दुपारी 2.20 वाजता - गेट क्रमांक 3दुपारी 3.20 वाजता - गेट क्रमांक 4