कोल्हापूर : गेल्या दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर अखेर आज शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण झाले होते. यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. काही मिनिटातच झालेल्या या पावसामुळे मात्र सर्वत्र ओलेचिंब झाले होते. अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची, विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली.
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातही आज, शनिवारपासून आठवडाभर पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला.
मात्र या पावसामुळे शेतीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. सध्या खरिपातील भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे. हा पाऊस तसा नुकसानकारक असला तरी रब्बी पिकांसाठी मात्र महत्त्वाचा ठरणार आहे. दिवाळीनंतर काहीशी थंडीची चाहूल लागून हुडहुडी भरत असतानाच पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे.