कोल्हापूर : दिवसांगणिक वेगाने होणाऱ्या वातावरणीय बदलातून काल, गुरुवारी दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दि. ७ जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणासहीत तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या पावसाने साखर गाळप हंगामात अडचणी येणार आहेत.शहरात विविध ठिकाणी काल, सायंकाळी ७:३० वाजल्यापासून तासभर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी चांगला पाऊस पडला. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. अनेक परिसरात पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात झाली. सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ डिग्री सेल्सिअस ग्रेड आणि दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यान आहे. पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ डिग्री सेल्सिअस ग्रेडने अधिक आहे, तर दुपारचे कमाल तापमान सरासरीच्या पातळीत आहे.
पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणउत्तरेकडून अधिक उंचीवरून मुंबईत विनाअडथळा येणारे थंड कोरडे वारे आणि खालच्या पातळीतून दक्षिण भारतातूनही पूर्वदिशा झोताचे आर्द्रतायुक्त वारे, सह्याद्रीतून वाऱ्याची दिशा बदलातून गुजरातच्या डांगी घळीतून मुंबईत प्रवेश करत आहे. ह्या वाऱ्यांच्या संयोगातून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवत आहे. हे वातावरण पुढील तीन दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.