कोल्हापूर : मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बसलेल्या कोल्हापूरकरांना गुरुवारी तुरळक सरींवर समाधान मानावे लागले. गुरुवारची पहाट ढगांच्या गडगडाटाने उगवली; पण पावसाच्या हुलकावणीने हिरमोड झाला. सकाळी ढगांनी आभाळ भरून आले, सोसाट्याचा वाराही सुटला; पण नऊ वाजल्यानंतर वातावरण निवळल्याने प्रतीक्षेत बसलेल्यांच्या आशेवर पाणी फिरले. दुपारनंतरच आभाळ निरभ्र होऊन वातावरणात उष्मा वाढल्याने पुन्हा डोळे आभाळाकडे लागले.गेल्या दोन महिन्यांपासून वळवाचा एकही पाऊस झालेला नाही. मध्यंतरी फनी चक्रीवादळामुळे पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता; पण तोही फोल ठरला. जिल्ह्याने कधी नव्हे इतक्या ४३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानासह उष्णतेची लाट अनुभवली. निदान जून महिना उजाडला तर उष्म्यापासून सुटका होईल अशी नागरिकांची अटकळ होती; पण जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सकाळी ढग भरून येतात; पण पाऊस काही पडत नाही. गुरुवारची पहाट मात्र ढगांच्या गडगडाटानेच उगवली. वारा आणि गडगडाट असल्याने जोरदार पावसाची शक्यता होती; पण काही भागाचा अपवाद वगळता तुरळक सरी पडल्या. पाच-दहा मिनिटांत हा पाउस थांबला. वाऱ्यामुळे वातावरणातही गारवा तयार झाला; पण नऊनंतर सूर्यदर्शन झाल्याने पुन्हा उष्णतेचा तडाखा वाढू लागला. दिवसभर तडाखा कायम राहिला. पावसाचे वातावरणही नाहीसे झाले.