राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : ऑगस्ट महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आले आहेत. पाऊस थांबला आणि उन्हाचा कडाका वाढल्याने त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. अशा वातावरणात ताप, थंडी, डोकेदुखीसह इतर आजाराने डोके वर काढल्याने नागरिकांनी आरोग्य सांभाळण्याची गरज आहे.
जुलै महिन्यात चार दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने सगळीकडे महापुराने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. २४ जुलैनंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर पूर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. त्यानंतर पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू राहिला. ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली. पडेल तिथे पडेल असाच पाऊस राहिला. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३० मिलिमीटर पाऊस झाला. साधारणत: ऑगस्ट महिन्यात ४७७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो, म्हणजेच केवळ २७ टक्के पाऊस झाला.
आकडेवारी काय सांगते?
महिना अपेक्षित पाऊस झालेला पाऊस किमान तापमान कमाल तापमान
जून ३३९.९ मिमी ३९७.९ मिमी २६ डिग्री ३४ डिग्री
जुलै ७५७ मिमी ७४०.४ मिमी २५ डिग्री ३० डिग्री
ऑगस्ट ४७७ मिमी १३० मिमी २४ डिग्री ३१ डिग्री
ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस
ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी ५२५ मिलिमीटर पाऊस हाेतो. २०१९ मध्ये एकाच महिन्यात सरासरी १०९३ मिलिमीटर नोंद झाली. मात्र, यंदा सरासरी १३० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कोठे किती पाणीसाठा टीएमसीमध्ये
प्रकल्प पाणी साठा टक्केवारी
राधानगरी ७.८७ ९४
तुळशी ३.४६ ९९
वारणा ३१.५० ९२
दूधगंगा २३.५६ ९३
कासारी २.४७ ८९
कडवी २.४९ ९९
कुंभी २.४८ ९१
पाटगाव ३.४४ ९३
मागील पाच वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमान, मिलिमीटरमध्ये
वर्ष एकूण पडलेला पाऊस सरासरी पाऊस
२०१६ ५४६७ ४५३
२०१७ २१५९ १७९
२०१८ ५७३४ ४७७
२०१९ १३११६ १०९३
२०२० ६७८२ ५६५
२०२१ १९०४ १३०
तापाची फणफण वाढली...
वाढलेल्या तापमानाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, यामुळे ताप, खोकला, डोकेदुखीने डोके वर काढले आहे. त्यातच महापुराचे पाणी येऊन गेलेल्या गावांत चिकुनगुनिया, डेंग्यू, टायफॉइडने नागरिक त्रस्त आहेत. यासाठी नागरिकांनी विनाकारण उन्हात बाहेर पडू नये, अशा वातावरणात काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. आनंद सूर्यवंशी यांनी सांगितले.