कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारीही जिल्ह्यात एकूण ९.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रविवारपर्यंत कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरात पावसाचा जोर कायम ठेवला आहे. गुरुवारीही जिल्ह्यात ९.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर शहरात गुरुवारी २९ अंश कमाल तर २२ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दरम्यान, विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात रविवारपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पावसाचे दुसरे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी आठ दिवस आधीच सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात गगनबावड्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजे १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ करवीर १७.५, शाहूवाडी १६, राधानगरी १३.५, चंदगड १०.६, पन्हाळा ९.६, हातकणंगले ८.१, कागल ७.२, शिरोळ ६.७, भुदरगड ४.७, आजरा ३.६, गडहिंग्लज २.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे दुसरे आवर्तनपावसाचे दुसरे आवर्तन त्याच्या नियोजित तारखेऐवजी सहा दिवस अगोदर म्हणजे दि.१६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सुरू झाले आहे. प्रत्यक्षात दि. २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यात विशेषत: सातारा आणि सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ईशान्य मान्सूनचे आगमनदरम्यान, हा परतीचा पाऊस नसून याचे रूपांतर दि. १५ ऑक्टोबरपासूनच नैऋत्य मान्सून म्हणजे ईशान्य मान्सूनमध्ये झाल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. तीन महिन्यांत चार राज्यांत नैऋत्य मान्सूनोत्तर हिवाळी पाऊस म्हणजेच ईशान्य मान्सूनचे आगमन होत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातही ह्यापुढे तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस म्हणूनच संबोधले जाते.