पट्टणकोडोली येथील रव्याच्या माळावर १२० घरांची लोकवस्ती आहे. गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महिला, वृद्ध व लहान मुलांना पाण्यातूनच ये-जा करावी लागत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उपसरपंच अंबर बनगे, सदस्य धुळा डावरे व बिरु कुशाप्पा यांनी रव्याच्या माळाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने चर मारण्याचे काम त्वरित चालू केले. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच बौद्ध समाज परिसरातील तुंबलेल्या गटारीही स्वच्छ करण्याचे काम ग्रामपंचायतीतर्फे सुरू असल्याने ग्रामस्थांची पाण्यामुळे होणारी अडचण दूर होत आहे.
२० पट्टणकोडोली पाणी
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील रव्याच्या माळ परिसरातील लोकवस्तीमध्ये पावसाचे पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यावेळी ग्रामस्थांची सोय करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे काम चालू केले आहे.