कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरात मंगळवारी मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. निळंशार आकाश, त्यात क्षणात भरून येणारे काळेभोर ढग, पांढऱ्या ढगांचे डोंगर आणि मध्येच ढग उतरेल तेथे येणारी पावसाची सर, असे मनोहारी वातावरण दिवसभर कायम होते. सकाळच्या टप्प्यात उष्मा असला तरी दिवसभर एकदम गार गार आल्हादायक वातावरण राहिले.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तेथे आगमन झाल्यानंतर सात दिवसांत तो कोकणमार्गे कोल्हापुरात दाखल होतो. आता मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. क्षणाक्षणाला वातावरण बदलत आहे. दिवसभर ऊन- सावल्यांचा, ऊन-पावसाचाही आनंद घेता येत आहे. एका ठिकाणी पाऊस पडतो, तर पुढच्याच दहा मिनिटांच्या अंतरावर ऊन पडलेले असते. यानिमित्ताने श्रावण महिन्यातील ऊन-पावसाच्या खेळाच्या स्मृती जाग्य होत आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार हे चार दिवस मान्सूनपूर्व पावसाचे असणार आहेत. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. सतत बदलणाऱ्या या वातावरणामुळे मात्र शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडत आहे. वादळी पावसावर भरवसा ठेवत मजूर मिळतील तशी भात, सोयाबीनच्या पेरण्या आटोपून घेतल्या जात आहेत. टोकन आणि धूळवाफ अशा दोन्ही पद्धतीने पेरण्या करून पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी पाणी देणेही सुरू आहे. त्यामुळे सध्या नदी, विहिरीवरील पाण्याच्या मोटारींची घरघर जोरात सुरू आहे. पाण्याचा एकदा उपसा वाढल्याने नदीपात्रातील पाणी पातळीही कमी झाल्याचे दिसत आहे.
शिवारे अनलॉक
लॉकडाऊनचे नियम कडक होत असले तरी शेत आणि शिवारे मात्र अनलॉक आहेत. मृग नक्षत्रावर बऱ्यापैकी धूळवाफ भात पेरणी व तरवे टाकण्याचे पूर्ण होते. कोरोनाला विसरून शेतकरी शिवारात आपल्या कुटुंबकबिल्यासह राबत आहेत. कष्टकऱ्यांमुळे शिवारे गजबजून गेली आहेत.
फोटो: ०१०६२०२१-कोल- आभाळ
फोटो : मान्सूनची चाहूल लागल्याने कोल्हापुरात आभाळात ढगांची गर्दी वाढली असून, निसर्गाचा सुंदर आविष्कार यानिमित्ताने अनुभवता येत आहे. (छाया : नसीर अत्तार)