कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढले आहे. जून महिना जवळजवळ कोरडा गेला असताना जुलैमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसला. तलाव छोटे-मोठे, काही धरणे भरून वाहू लागल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी घरांच्या पडझडबरोबरच शेतीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले आहे.कोल्हापूर-मलकापूर महामार्ग बंदकोल्हापूर-मलकापूर महामार्गावर केर्ली येथे पंचगंगेचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने तळकोकणातील वाहतूक मलकापूरमार्गे वळविली होती. आता येथे पाणी आल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे.चार बंधारे पाण्याखालीगडहिंग्लज : गडहिंग्लज शहर व तालुक्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने बुधवारी किरकोळ उघडीप दिली. मात्र, तालुक्यातील नांगनूर, निलजी, जरळी, ऐनापूर हे चारही बंधारे पाण्याखाली आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. बुधवारी दिवसभरात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, आजअखेर १८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी झालेला मंडलनिहाय पाऊस मि.मी.मध्ये असा : गडहिंग्लज (२१), महागाव (२८), हलकर्णी (२३), नेसरी (४७), कडगाव (२९), दुंडगे (२६), नूल (८).खोचीत पुराचे पाणीखोची : वारणा नदीच्या पाणी पातळीत बुधवारी झपाट्याने वाढच होत गेली. पाणी पात्राबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले. या पाण्यामुळे भैरवनाथ मंदिर परिसर पूर्ण व्यापला आहे. त्यामुळे मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद होऊन मंदिराचा संपर्क तुटला आहे. येथील स्मशानभूमीचा परिसर पूर्ण पाण्याखाली गेल्याने स्मशानभूमीचा मार्ग बंद झाला आहे.गणेश मंदिर परिसरात नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महसूल विभागाच्या वतीने पूररेषेतील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटिसा लागू केल्या आहेत. बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. तसेच वारणा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग चालू झाल्याने पाणीपातळीत मोठी वाढ होत होती. खोची-दुधगाव दरम्यानचा खोची बंधारा पाण्याखालीच आहे. बंधाºयावर चौदा ते पंधरा फूट पाणी आहे. हा मार्ग वडगाव पोलिसांनी बॅरेकेट लावून बंद केला आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वठार परिसरात शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. ऊस, भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांचा त्यामध्ये समावेश आहे.‘राधानगरी’ भरले; मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूराधानगरी : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पूर्ण भरले. धरणाची पाणी पातळी ३४७.५० फुटाच्या पुढे गेल्याने स्वयंचलित दरवाजांतून पाण्याच्या विसर्ग सुरू झाला. रात्री उशिरा धरणाचा चौथा दरवाजा खुला होऊन त्यातून ७११२ क्यूसेक्सने विसर्ग सुरू झाले.बुधवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी ६ क्रमांकाचा दरवाजा उघडला. त्यानंतर सव्वाबारा वाजता ३ क्रमांकाचा व सव्वा वाजता ५ व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला. यातून प्रत्येकी १४५६ क्युसेक्स प्रमाणे ४३६८ व जलविद्युतनिर्मिती केंद्रातून १४०० असा एकूण ५७६८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला. यामुळे नदीपात्राबाहेर पाणी पडले.यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यातही मध्यंतरी १५ दिवस त्याने दडी मारली होती. त्यामुळे धरण उशिरा भरेल असा अंदाज होता. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणी झपाट्याने वाढले. बुधवारी सकाळी आठ वाजता चोवीस तासांत या वर्षीचा उच्चांकी २०४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एकूण २७६६ मिलिमीटर पाऊस झाला.
पावसाचे थैमान; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 1:04 AM