कोल्हापूर : सकाळी पावसाचा शिडकावा आणि दिवसभर उन, ढगाळ असे वातावरण आज, गुरूवारी दिवसभर राहिले. मान्सूनचे अजूनही आगमन झाले नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पेरण्या खोळंबल्या आहेत. धूळवाफ पेरणीवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. खडकाळ जमिनीवरील ऊस वाळत आहे.जूनचा पहिला आठवडा कोरडा गेला. मृग नक्षत्रावरील पेरणीचा मुहूर्त हुकला आहे. आकाशात ढगांची गर्दी होत आहे. मात्र पाऊस जोरदार बरसत नसल्याचे चित्र आहे. गुरूवारी सकाळी नऊपर्यंत शहर, परिसर आणि जिल्हयात पावसाचा शिडकावा राहिला. त्यावेळी जोरदार पावसाला सुरूवात होणार असे ढग दाटून आले होते. पण काही वेळताच ढगांची गर्दी कमी झाली. प्रखर उन पडले. दुपारी उन्हाचा तडाका राहिला.जून महिला निम्मा संपला तरी उन्हाळाच जाणवत आहे. यामुळे साऱ्यांनाच पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. रेनकोट, छत्री असे पावसाळी साहित्य विकणारे दुकानदार, खते, बियाणे विक्रेत्यांचे डोळेही पावसाकडेच लागून राहिले आहेत. जोरदार पाऊस नसल्याने सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. नदीतील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. कोल्हापूर शहरासह नदी काठावरील गावांतही पाणी टंचाई निर्माण होत आहे. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे.
चोवीस तासातील पाऊस असागुरूवारी सकाळी आठपर्यंत झालेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस असा : हातकणंगले - ०, शिरोळ -०, पन्हाळा -०.१, शाहूवाडी २.५, राधानगरी -०.५, गगनबावडा-६.४, करवीर-०.१, कागल-०, गडहिंग्लज-१, भुदरगड-४.५, आजरा -८.९, चंदगड -३.६.
केवळ ४.२ टक्के पाऊसजिल्हयात १ ते १४ जून अखेर केवळ ४.२ टक्के पाऊस झाला आहे. जोरदार आणि दमदार पाऊसच नसल्याने पेरणी कामे थांबली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे.