कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर खडखडीत ऊन राहिले. सकाळच्या टप्प्यात अधूनमधून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या; मात्र नंतर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असून विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तीन फुटांनी कमी झाली.जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस कमी झाला असून, मंगळवारी सकाळपासून त्याने काहीशी विश्रांती घेतली आहे. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी एक-दोन जोराच्या सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर दिवसभर कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल तालुक्यांत खडखडीत ऊन राहिले.
धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.८० मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २८२८, दूधगंगेतून १८०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
वारणा धरणातून दुपारनंतर वीजनिर्मितीसाठी विसर्ग वाढवण्यात आल्याने ३०५४ घनफूट पाणी वारणा नदीत येत आहे. जिल्ह्यातील २२ बंधारे पाण्याखाली असून पंचगंगेची पातळी दिवसभरात तब्बल तीन फुटांनी कमी झाली. सात खासगी मालमत्तांच्या पडझडीत दोन लाख ७० हजारांचे नुकसान झाले आहे.धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा-राधानगरी (८.२८), तुळशी (३.३७), वारणा (३२.४६), दूधगंगा (२४.७५), कासारी (२.७०), कडवी (२.५२), कुंभी (२.५८), पाटगाव (३.७२).