लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप राहिली. अधूनमधून सरी कोसळल्या मात्र बहुतांशी काळ कडकडीत ऊन राहिले. पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी उतरण्यास सुरूवात झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली.
गेले चार-पाच दिवस पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. पहिल्या दोनच दिवसात नद्यांना पूर आल्याने तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेले होते. मात्र, शनिवारी दुपारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रविवारी सकाळी ऊन पडले हाेते. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या मात्र दुपारनंतर कोल्हापूर शहरात कडकडीत ऊन होते. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा व चंदगडमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे.
रविवारी सकाळी जिल्ह्यातील ४४ बंधाऱ्यावर पाणी होते, मात्र सायंकाळी तीन बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी दिवसभरात फुटाने कमी होऊन रविवारी रात्री ती ३३ फुटावर आली होती. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १३०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यात पडझडीत ४.६४ लाखाचे नुकसान
जिल्ह्यात पावसामुळे घरांची पडझड होऊन ४ लाख ६४ हजाराचे नुकसान झाले आहे. यामध्ये आजरा ५१ हजार, गडहिंग्लज ६३ हजार, हातकणंगले ६५ हजार, शाहूवाडी १५ हजार, पन्हाळा १ लाख २० हजार, कागल ३० हजार तर करवीर मध्ये १ लाख २० हजाराचे नुकसान झाले आहे.
प्रमुख धरणातील पाणीसाठा टीएमसी मध्ये असा, कंसात क्षमता-
वारणा -१७.४२ (३४.४०), दूधगंगा - ९.४२ (२५.४०), राधानगरी -३.०८ (८.३६), तुळशी - १.८५ (३.४७), कुंभी - १.३५ (२.७२), कासारी -१.०४ (२.७७), पाटगाव - १.८२ (३.२२), चिकोत्रा - ०.७४ (१.५२).