लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर / उदगाव / कुरुंदवाड : परतीच्या पावसाने शिरोळ तालुक्यात अक्षरश: दैना उडाली आहे. सध्या पडणाºया पावसाने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. २००५ नंतर प्रथमच परतीचा पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. रविवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे तालुक्यात सखल भागात अनेक पाण्याचे डोह साचले आहेत. शेतीपिकांत पाणी गेल्याने पिकांचे तर नुकसान झाले आहेच, शिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझडदेखील झाली आहे. सध्या शासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात आहे. त्यातच दिवाळीची सुटी पडणार असल्याने दिवाळीनंतरच पंचनामे होणार असून, त्यानंतरच नुकसानीचा आकडा समजणार आहे.शिरोळ तालुक्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे. पाऊस कमी, पण महापुराची हमी असलेल्या तालुक्यात आता परतीच्या पावसाने शेतकºयांसह नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पाऊस झाल्याने शेतकºयांवर संकट आले आहे. उसाच्या लावणी, भुईमूग, मूग, कोबी, फ्लॉवर यासह लहान पिके कुजली आहेत. ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिपावसामुळे केलेल्या ऊस लावणी वाया जाण्याची शक्यता असून, पुन्हा लावणी कराव्या लागणार आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका रोपवाटिकाधारकांना बसला आहे.अन्यथा नैसर्गिक आपत्ती : ओढे-नाल्यांचे अस्तित्व टिकविण्याची गरजसलग झालेल्या परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणचे ओढे-नाले नाहीसे झाल्यामुळे पावसाचे पाणी निचरा होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात सध्या अस्तित्वात असलेले ओढे-नाले वाचविण्याची गरज आहे. अन्यथा नैसर्गिक मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.
शिरोळला परतीच्या पावसाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:07 AM