कोल्हापूर : ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफरचंद, सीताफळ, डाळींब, मोसंबी, पेरूंची रेलचेल दिसत आहे.यंदा खरिपाची पिके चांगली होती, त्यामुळे उत्पादन चांगले होईल, परिणामी कडधान्यांचे दर स्थिर राहतील, असा अंदाज होता. मात्र, विदर्भात महापुराने मोठे नुकसान केले. त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रात गेल्या आठ-दहा दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस कोसळत असल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्याचा थेट परिणाम कडधान्य बाजापेठेवर दिसत आहे.
उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता गृहीत धरून व्यापाऱ्यांनी आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच डाळीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळ १०० ते १०५ रुपये, हरभराडाळ ७० ते ७२ रुपये किलो आहे. सरकी तेलाने यापूर्वीच शंभरी ओलांडली आहे. मूग १०० रुपये, मूगडाळ १२० तर मसूर डाळ १०० रूपये किलो राहिली आहे. ज्वारी प्रतीनुसार ३० ते ६० रुपये किलो तर शाबू ७० रुपये किलो आहे.पावसामुळे भाजीपाल्यालाही फटका बसला असला तरी मागणी आणि आवक यांत फारसा फरक नसल्याने दरदामामध्ये चढउतार दिसत नाही. कोबी वगळता गेल्या आठवड्याच्या तुलनेत इतर भाज्यांचे दर काहीसे स्थिर राहिले आहेत.
कोथंबिरीचीची आवक थोडी कमी झाली असली तरी दरात फार फरक पडलेला नाही. मेथी, पालक, पोकळा, शेपूची आवकही मर्यादित असल्याने दर कायम आहेत.गणेशोत्सवानंतर फळबाजार काहीसा शांत झाला होता. मात्र या आठवड्यात सफरचंद, मोसंबी, चिक्कू, पेरू, डाळींब, सीताफळांची रेलचेल सुरू आहे. सफरचंद १०० ते १६० रुपये किलोपर्यंत आहे. सीताफळांची आवक हळूहळू वाढू लागली आहे.
बाजार समितीत २०० ते ६०० ढीग (१२ ते १५ नग) असा सीताफळांचा दर राहिला आहे. यंदा दसरा महिनाभर लांबणीवर गेल्याने सप्टेंबरमध्ये फळांना असणारी तेजी यंदा दिसत नाही.ओला वाटाणा ६० रुपयांवरओला वाटाणा घाऊक बाजारात ११० रुपये तर किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. आता आवक थोडी वाढू लागली आहे, रविवारी कोल्हापुरात २० पोत्यांची आवक झाल्याने दर ६० रुपये किलोपर्यंत आला होता.कांदा-बटाटा स्थिरकांदा, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी १०, तर बटाटा २५ रुपये किलो आहे.