कोल्हापूर : जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोर धरला आहे. पावसाचा जोर मंदावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट होत असतानाच आज, शनिवारी पावसाची रिपरिप सुरु झाली. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होत आहे. सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी ३१ फूट ४"इंच इतकी झाली असून २६ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. यातच आज चंदगड तालुक्यातील पिळणी येथील पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.गेली दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी जिरवणीचा पाऊस होत असल्याने पिकांना पोषक आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. भात व नागली रोपलागणीची धांदल सुरु झाली आहे. धरणक्षेत्रात मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. काल, शुक्रवारी राधानगरी धरणात ३.५३, वारणात १४.६२ तर दूधगंगेत ९.०१ टीएमसी पाणीसाठा होता. वीजनिर्मितीसाठी राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १२००, वारणातून ७१० तर दूधगंगेतून ७०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज, शनिवारपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.पडझडीत ४.४५ लाखांचे नुकसानजिल्ह्यात काल, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत ५ घरांसह १३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ४ लाख ४५ हजारांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच; चंदगड तालुक्यातील पिळणी पुलावर आलं पाणी, वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 6:15 PM