लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसभर जोरात पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासूनही रिपरिप कायम राहिली. आठ-दहा दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने सुरुवात केली असून शेतीला पूरक असाच पाऊस पडत आहे.
महापुरानंतर आठ-दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. एकदम पावसाने दडी मारल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील पिके अडचणीत येण्याचा धोका होता. भात पिकाला कायम पाणी लागते. मात्र, पाऊस थांबल्याने पाणी कमी झाले होते. गेली दोन दिवस पावसाने चांगली सुरुवात केली आहे. गुरुवारी दिवसभर करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड तालुक्यात संततधार सुरू होती. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी पावसाने उसंत घेतली. मात्र, सकाळी अकरानंतर रिपरिप सुरू झाली. हा पाऊस शेतीला पोषक असून उघडिपीनंतर पाऊस झाल्याने पिकांच्या वाढीस मदत होणार आहे. रुई आणि इचलकरंजी हे दोन बंधारे पाण्याखाली असून राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.
कोल्हापूर शहरात दुपारनंतर कडकडीत ऊन पडले. सायंकाळनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची भुरभुर राहिली.
पंचगंगेची पातळीत फुटाने वाढ
दोन दिवस पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी फुटाने वाढ झाली आहे. सध्या पंचगंगा १५.८ फुटावर आहे.