लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. एकसारख्या सरी कोसळत राहिल्याने हवामानात गारठा जाणवत होता. राधानगरी धरणातून मंगळवारी प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सोमवारच्या तुलनेत पंचगंगेच्या पातळीत तब्बल दीड फुटाने वाढ झाली.
कोल्हापूरात चार-पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी त्यात सातत्य नव्हते. पडेल तिथे पडेल असा पाऊस होतो. सोमवारी सायंकाळ पाऊस वातावरणात बदल झाला. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर त्यात वाढ होत जाऊन एकसारखी रिपरिप सुरू राहिली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप पिकाला पोषक आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर शहरातही दिवसभर रिपरिप राहिली. पाऊस व गार वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. बऱ्याच दिवसानंतर एकसारखा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडू वाटत नव्हते. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस सुरू आहे. ‘कुंभी’ धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल ११७ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरीसह इतर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरीतून प्रतिसेंकद १४०० घनफुट पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी मंगळवारी पाच वाजता १५.७ फुटावर होती.
जिरवण्याची पाऊस...
एकदम धो धो कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान होते. बांधफुटीसह पिकांच्या वाढीस असा पाऊस उपयुक्त नसतो. त्यापेक्षा आता ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, तसा जिरवण्याची पाऊस अधिक उपयुक्त आहे.
फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (फाेटो-०७०९२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)