कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दुपारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. रिपरिप सुरू असून गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात मात्र जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून नद्यांची पातळी वाढत आहे.जिल्ह्यात रविवारी पावसाची उघडीप होती. दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. मात्र, सोमवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. सकाळपासून भुरभुर सुरू झाली. दुपारनंतर त्यात वाढ होत गेली. गगनबावडा तालुक्यात जोरदार सरी कोसळत आहेत.
सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असल्याने नद्यांची पातळीत वाढत आहे. पंचगंगेची पातळी २३ फुटांपर्यंत पोेहोचली असून, बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून १३५०, वारणातून १११० तर, घटप्रभा मधून ३९९३ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.