कोल्हापूर : वाढलेल्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शहरवासीयांना गुरुवारी पावसाने गार केले; परंतु त्यात जोर नव्हता. पाऊस पडला नाही तर नुसताच ‘शिताडल्या’चा अनुभव आला. काही भागांत मात्र जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, शिरोली, शिये परिसरात जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर शिरोळ, हातकणंगले व करवीर तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर वगळता राज्याच्या अनेक भागांत गेल्या चार दिवसांत चांगला वळीव पाऊस पडला आहे. त्यामुळे पाऊस कोल्हापूरवर रुसला आहे की काय, अशी विचारणा लोक करीत होते. आज दिवसभरही कमालीचा उष्मा होता. अंग भाजून निघत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास एकदमच पावसाळी वातावरण झाले. आकाशात काळे ढग दाटून आले. वारे जोराने वाहू लागले. त्यामुळे धुळीचे लोट उसळले. लोकांची तारांबळ उडाली. रस्त्यांवरील विक्रेत्यांची सामान हलविताना धांदल उडाली. पाऊस आला आला असे म्हणेपर्यंत टप-टप थेंब पडू लागले. वादळी वारेही तितक्याच जोराने वाहत असल्याने पावसाचा जोर कमी झाला. तरीही सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.मातीचा गंध मन आबादानी करून गेला. (प्रतिनिधी)
पावसाच्या हलक्या सरीने गारवा
By admin | Published: May 13, 2016 12:41 AM