राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर ओसरला
- राधानगरी तालुक्यात गेल्या चार दिवस सुरू असणाऱ्या धुवांधार पावसाने आज सोमवारी काहीशी उसंत घेतली, तर पावसाचा जोर कमी झाल्याने दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. अधूनमधून सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने राधानगरीच्या डोंगर-दऱ्यामध्ये निसर्गाचा सप्तरंगी इंद्र धनुष्याचा अविष्कार चक्क चक्रेश्वर मंदिरावरून पाहायला मिळाला.
राधानगरी तालुक्याच्या सर्व भागात गेल्या काही दिवसांमध्ये दोनशे मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहू लागले. दरम्यान आज दिवसभर पावसाने उसंत घेतली होती. काही काळ पाऊस थांबून उबदार उन्हाच्या झळा पडत होत्या, त्यामुळे हिरव्या निसर्गाला तेज दिसून येत होतं, अभाळाचा काही भाग निळाभोर दिसत होता. चक्रेश्वर डोंगर आणि मंदिर परिसरामध्ये सूर्याच्या तिरप्या किरणांमुळे इंद्रधनुष्य साकारला होता. सायंकाळनंतर मात्र पावसाने हलका शिडकावा सुरू केला.
फोटो ओळ- चक्रेश्वरवाडी ता राधानगरी येथील मंदिरावर इन्द्रधनुष्याचा आविष्कार.( छाया : नामदेव कुसाळे)