कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पातळीत घट झाली. गुरुवार (दि. १८)च्या तुलनेत पाण्याखाली गेलेले पाच बंधारे मोकळे झाले. अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत.गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. शुक्रवारी सकाळी काही तालुक्यांत उघडझाप, तर काही ठिकाणी पूर्णपणे उघडीप राहिली. दुपारच्या टप्प्यात काही वेळ ऊन पडले होते. एकूणच मागील दोन दिवसांच्या तुलनेत पाऊस कमी झाला असून, धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे.
नद्यांच्या पातळीत घट झाल्याने दिवसभरात पाच बंधारे मोकळे झाले; तर अद्याप २२ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगेची पातळी २५ फुटांवर असून राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १९०८ , तुळशीतून ५००, वारणातून एक हजार, तर काळम्मावाडीतून ६२९ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गगनबावड्यात काल ७१.५० मिमी पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ७१.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले- ७.५० एकूण ९९.३८ मिमी, शिरोळ- ५.५७ एकूण ६९.५७ मिमी, पन्हाळा- २२.७१ एकूण ३२६ मिमी, शाहुवाडी- ३८.५० मिमी एकूण ४२१ मिमी, राधानगरी- ३९.३३ मिमी एकूण ४३८.३३ मिमी, गगनबावडा-७१.५० मिमी एकूण ९७८.५० मिमी, करवीर- २१.६४ एकूण ३०१.८२ मिमी, कागल- १५.७१ एकूण ३२३ मिमी, गडहिंग्लज-१०.८६ एकूण १९६.२९ मिमी, भुदरगड- ३४.८० एकूण ३६७ मिमी, आजरा- ३४.७५ मिमी एकूण ४०५.७५ मिमी, चंदगड- ४४.५० मिमी एकूण ४५५.१७ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.