कोल्हापूर: रिमझीम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी आनंदला आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.कोल्हापुरात संपूर्ण मे महिन्यात वळवाने आणि त्यापाठोपाठ वेळेत आलेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पूराची परिस्थिती निर्माण झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने उघडीप घेतली. तेव्हापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. पावसाऐवजी कडकडीत ऊन पडत असल्याने पिकांची होरपळ वाढली होती.गुरुवारपासून पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण गुरुवारी पावसाने हुलकावणी दिली, दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने कांहीसा दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मात्र पावसाचे आगमन झाले. सकाळी सातपर्यंत पाऊस कोसळत राहिला. त्यात फारसा जोर नसलातरी होरपळणारी पिके जगवण्यापुरता पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला.
शुक्रवारी दिवसभर असेच ढगाळ वातावरण राहिले. बारा वाजण्यास सुमारास हलक्याशा सरी कोसळू लागल्या. त्यानंतर दुपारी उघडीप दिली. परत संध्याकाळी पाचनंतर रिमझीम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत असल्याने पुढील चार दिवस जोरदार पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.