आजरा : आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात चालू वर्षी १६ ते १९ जून दरम्यान २० वर्षांतील उच्चांकी पाऊस, तर २४ जून ते ३ जुलै दरम्यान फक्त ४४ मि.मी. नीचांकी पाऊस झाला. पावसाअभावी रोप लावणीसह पेरणी केलेल्या जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे.
कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले किटवडे हे गाव आहे. आंबोलीच्या डोंगर माथ्यावरील पडणाऱ्या पावसापेक्षा आजरा तालुक्यातील किटवडे येथे जास्त पाऊस पडतो. पावसाचे माहेरघर अशी महाराष्ट्र व राज्याच्या पाऊस खात्यामध्ये किटवडेची नोंद आहे.
प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत दररोज १५० ते २०० मि.मी. पाऊस या ठिकाणी पडतो. याच पावसाने आजरा तालुक्यातील एरंडोळ, धनगरवाडी धरणे भरली, तर चित्रीमध्ये ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसळधार पावसानंतर सर्वत्र भातरोप लावणी केली जाते. मात्र, सध्या हत्ती, गवे यासह जंगली जनावरांचा असणारा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दहा दिवसांपासून या परिसरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे भात रोप लावणीची कामे खोळंबली आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी मोटारीने पाणी पाजून भात रोप लावणी करण्यास सुरुवात केली आहे. पावसाचा लहरीपणा, चालूवर्षी शेतकऱ्यांना धोक्याची घंटा देऊन जात आहे.
दहा दिवसांतील पाऊस असा २४ जून - १० मि.मी. २५ जून - ११ मि.मी. २६ जून- १.५० मि.मी.
२७, २८, २९ जून - निरंक ३० जून - २.५० मि.मी.
१ जुलै - १० मि.मी.
२ जुलै - ११ मि.मी.
३ जुलै - १० मि.मी.
१ मे ते ३ जुलैअखेर - २०३२ मि.मी. -------------------------
पावसाअभावी जमिनीला भेगा
आजरा तालुक्यात सर्व पिकांची पेरणी पूर्ण, तर रोप लावणी ७० टक्के क्षेत्रावर पूर्ण झाली आहे. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्याने कोळपणी व बाळ भांगलणी पूर्ण झाली. मात्र, गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाऊस रुसल्याने जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे.