कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक व महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल रविवारी दुपारी नागपूर येथे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. उच्च न्यायालयात टिकलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकण्यासाठी दिल्लीत वकिलांची फौज उभी करा, अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली.आरक्षणासाठी मराठा समाजाला मोठा संघर्ष करावा लागला आहे. मराठा समाजाच्या मागण्या रास्तच होत्या; यासाठी अनेकांनी आपले बलिदानही दिले आहे. मुख्यमंत्री या नात्याने प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेत आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलात याबद्दल संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले पाहिजे; यासाठी खूप गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या प्रयत्नासारखेच प्रयत्न दिल्लीमध्येसुद्धा केले पाहिजेत. ते तुम्ही तसे प्रयत्न कराल, असा विश्वास आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
आरक्षण आंदोलनावेळी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याविषयी आपण यापूर्वी मागणी केली आहे, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी पुन्हा मागणी संभाजीराजेंनी केली. यावर मराठा आरक्षणाचा महत्त्वपूर्ण लढा आपण जिंकलोच असून, मराठा समाजाच्या सर्व मागण्यांविषयी सरकार गंभीर आहे. दिल्लीतसुद्धा कुठेही कमतरता भासू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.