कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.
कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मोहीते यांनी लक्ष्मीपूरी, जुना राजवाडा, राजारामपूरी व शाहूपूरी या पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यावेळी प्रभारी अधीकारी, गुन्हे शाखेचे (डी.बी) पोलीस कर्मचारी यांची बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.
कायदा सुव्यवस्थेबरोबरच सर्वत्र शांतता राहावी, यासाठी नियोजन करावे. रेकॉर्डवरील(अभिलेख) सराईत गुन्हेगारांना हद्दपार करा, डॉल्बीचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे गणेशोत्सवात डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारली आहे. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तिंचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली आहे.
कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, यासाठी गणेशोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा. मंडळांच्या वैयक्तिक बैठकीवर भर द्या आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, निशिकांत भुजबळ, संजय साळुंखे,संजय मोरे आदी उपस्थित होते.