लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : अंबाबाई देवीचे लक्ष्मीकरण हा धर्मद्रोहच आहे. देवस्थानला येणारा पैसा हा समाजासाठी वापरला गेला पाहिजे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच पुजाऱ्यांकडून देवीच्या पैशांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. त्यामुळे शासनाने यात महिन्याभरात हस्तक्षेप करून पुजाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा आणि ती सरकारजमा करावी, यासाठी येत्या २४ तारखेपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.पन्हाळा-पावनखिंड मोहिमेसाठी ते कोल्हापुरात आले होते. अंबाबाई मंदिर प्रश्नासंबंधी त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या देवीचे स्वरूप शिवपत्नी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तिला विष्णुपत्नी करून तिचे लक्ष्मीकरण करणे चुकीचे आहे. मी कायम अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या बाजूने उभा राहीन आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन लढा देईन, असेही कडू यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुभाष देसाई, वसंत मुळीक, देवदत्त माने, शरद तांबट, डॉ. जयश्री चव्हाण, अॅड. चारूलता चव्हाण, डॉ. खंडागळे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्राची कर्जमाफी...अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान आहे. देवीचे कित्येक वर्षांचे उत्पन्न पुजाऱ्यांकडे आहे. यातून आणि वर्षाकाठी मिळणाऱ्या तीनशे-साडेतीनशे कोटींच्या उत्पन्नातून अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असेही कडू यांनी सांगितले.
‘पुजारी हटाओ’साठी विधानसभेत आवाज उठवू
By admin | Published: July 09, 2017 12:49 AM