कोल्हापूर : मिरज-कुर्डूवाडी मार्गावरील डेमू रेल्वेचे (डिझेल मल्टिपल युनिट) दोन डबे वाढविण्यात आले आहेत. कोल्हापूर-सांगली मार्गावरील रेल्वेसाठीदेखील लवकरच त्यादृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मध्य रेल्वेने दिले आहे.पॅसेंजर रेल्वेला पूर्वी १२ ते १३ डबे असायचे; त्यामुळे जास्तीत जास्त प्रवासी त्यातून प्रवास करत होते; मात्र, ‘डेमू’ला केवळ आठ ते नऊ डबे आहेत. त्यातील प्रत्येक डब्यातून साधारणत: ८० प्रवासी जाऊ शकतात. मिरज-कोल्हापूर मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या त्या तुलनेत अधिक आहे; त्यामुळे डेमूच्या डब्यांची संख्या वाढविण्यात यावी, या मागणीसाठी रुकडी, जयसिंगपूर परिसरातील प्रवाशांनी मंगळवारी (दि. २३) आंदोलन केले.
त्याची दखल घेत मध्य रेल्वेने डेमूचे डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली, मिरज-कुुर्डूवाडी या मार्गावर डेमू धावते. त्यातील मिरज-कुर्डूवाडी मार्गावरील रेल्वेचे दोन डबे वाढविले आहेत. कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-पुणेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.