कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे हे शिवद्रोही असून त्यांनी छत्रपतींच्या पुतळ्यासमाेर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याच्या कटात राज ठाकरे सहभागी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
मृत्यूनंतर वैर संपले असे म्हटले जाते. वैर संपते; पण विकृती संपते का? वैर तर पुरंदरेंनीच धरले. आमच्या अस्मितांची निंदानालस्ती केली. त्याविरुध्द आम्ही लढलो. लढत आहोत. लढत राहू. सांस्कृतिक स्वातंत्र्यासाठी लढणे वैर नाही किंवा कोणाचा द्वेष करणे नाही. मृत्यूनंतरही विकृती कायम रहात असेल तर त्या विकृतीला विरोध करायलाच हवा. अन्यथा त्याचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्यांवर होतात. पुरंदरे विकृतीचे परिपाक आहेत. जेम्स लेनचा खरा ब्रेन तेच होते. अशा पुरंदरेंचे राज ठाकरे नेहमी उदात्तीकरण करतात हेच आक्षेपार्ह आहे, असे कोकाटे म्हणाले.
शिवाजी महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह विजापूर मुक्कामी झाला होता. या विवाहाला भोसले निंबाळकर परिवारातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. खुद्द आदिलशहाने विवाहसमारंभाला येऊन शुभेच्छा दिल्याचा पुरावा निंबाळकर दप्तरात सापडतो. तरी देखील पुरंदरेंनी जाणीवपूर्वक शहाजीराजांना गैरहजर दाखवण्यासाठी त्यांनी ते लग्न पुणे मुक्कामी झाले असे दाखवले, असे कोकाटे यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, राम पोवार उपस्थित होते.