कोल्हापूर : सांगली व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे ‘स्वाभिमानी’ साठी जाहीर सभा घेणार आहेत. शरद पवार यांच्या आग्रहास्तव महाआघाडीच्या प्रचारात सक्रिय झालेल्या ठाकरे यांनी या दोन्ही मतदारसंघांत सभा घ्यावी, असे आमंत्रण खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे. ठाकरे यांनी होकार कळविला असून, शनिवारी (६ एप्रिल) अधिकृत दौऱ्याची घोषणा होणार आहे, असे ‘स्वाभिमानी’च्या सूत्रांनी सांगितले. या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाची पार्श्वभूमी असलेले शेट्टी व ठाकरे हे प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने यांच्या बॅटिंगची उत्सुकता आतापासून लागली आहे.रोखठोक बोलण्याने ‘सत्ताधाऱ्यांवर तुटून पडणारा नेता’ म्हणून राज ठाकरे यांची युवावर्गामध्ये विशेष क्रेझ आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तर त्यांनी सत्ताधारी सेना-भाजपविरोधात मोहीमच उघडली आहे. त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळेप्रमुख विरोधक असलेल्याकाँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना नजीक केले आहे.स्वत: शरद पवार यांनी त्यांना जाहीर सभा घेण्याचा आग्रह धरला आहे. तो ठाकरे यांनी मान्य केला आहे. शिवाय लोकसभेच्या मैदानात माघार घेऊन त्यांनी पूर्णवेळ महाआघाडीच्या प्रचारासाठी वेळ दिला आहे.महाआघाडीच्या जागावाटपात सांगली व हातकणंगले हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आले आहेत. सांगलीतून विशाल पाटील, तर हातकणंगलेतून स्वत: शेट्टी हे सलग तिसऱ्यांदा हातात बॅट घेऊन मैदानात आहेत. त्यांच्या बॅटिंगला आता राज ठाकरे यांची जोड मिळणार आहे.विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघांत युवा मतदारांची संख्या जास्त आहे. युवकांमध्ये ठाकरे यांच्या असलेल्या क्रेझचा लाभ होणार असल्यानेच स्वत: शेट्टी यांनी पवारांमार्फत सभा घ्यावी, असा आग्रह धरला आहे. सांगली व हातकणंगलेसाठी एकत्रित सभा घेण्याचे नियोजन आहे.गांधी कुटुंबीयांच्याही सभायाच वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांनाही जाहीर सभेसाठी आणण्याचे नियोजन सुरू आहे. ४ ते १७ एप्रिल या काळात गांधी कुटुंबीय महाराष्ट्रातील या भागांत प्रचारसभा घेणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. कोल्हापूर व सांगली या दोन्हींसाठी या सभा होणार असल्याने महाआघाडीच्या वतीने आता खºया अर्थाने प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे.
‘स्वाभिमानी’च्या मैदानावर राज ठाकरेंची बॅटिंग;सांगली, हातकणंगलेसाठी जाहीर सभा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:58 AM